blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग  १०

सेंद्रिय कार्बन जमिनीत तयार होणे हे सेंद्रिय घटकांच्या मदती  शिवाय तयार होणे जवळपास अशक्यच आहे. नैसर्गिक रित्या जमिनीत सेंद्रिय कार्बन व ह्युमस निर्मिती मध्ये विविध जिवाणूं चा फार मोठा वाटा आहे, सेंद्रिय घटकांना कुजण्याच्या प्रक्रियेत एकच कुठला विशिष्ट जिवाणू च नव्हे तर असंख्य प्रकारचे जिवाणू एकाच वेळी हे कार्य पार पाडत असतात, एखादा सेंद्रिय पदार्थ  कुजविने म्हणजेच विघटीत करणे, (सडविण्याची  प्रक्रिया थोडी भिन्न असते, याही प्रक्रियेत जिवाणू च काम करतात) कुजविण्याच्या प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन,  नायट्रोजन  सारखे वायू  वापरले जातात व तयारही होतात तर सडविण्याच्या प्रक्रियेत अमोनिया, मिथेन, सल्फर, ओझोन सारखे विषारी वायु तयार होत असतात. कुजण्याची प्रक्रिया ऊघड्या हवेत किंवा हवायुक्त ठिकाणी चांगली होते परंतु हिच प्रक्रिया  हवाबंद अवस्थेत केली तर तिथे कुजण्या ऐवजी सडण्याची (फर्मेंटेशन) प्रक्रिया  चालू होते. आता आपण द्राक्ष बागेकडे वळुया, द्राक्ष बागेत प्रत्येक बहारा पुर्वी जमिनीत  सेंद्रिय घटक टाकले होते जातात,  यात सर्वात मोठा घटक म्हणजे शेनखत, बहुसंख्य शेतकरी द्राक्ष वेलीच्या खोडाजवळ किंवा दिड दोन फुट अंतरावर खड्डे घेऊन त्यात टाकून मातीने बुजवुन घेतात, बर्याचदा हे शेनखत कच्चेच म्हणजे पुर्ण न कुजलेलेच असते, जमिनीत गाडले गेल्यानंतर तिथे पुढील कुजण्याची प्रक्रिया चालू होते,  या कुजन्याच्या प्रक्रियेत प्रचंड ऊष्णता तयार होते, (प्रसंगी 50 ते 65 अंश डिग्री सेल्सियस)  शिवाय ही प्रक्रिया  द्राक्ष मुळी जवळच चालु असते, ऐवढ्या ऊष्णतेचा मुळीवर विपरित परिणाम होतो, कारण जमिनीत मुळे व मुळांची बाह्य त्वचा फारच नाजूक असते त्यामुळे मुळाना एक प्रकारचा झटका बसतो, या शिवाय शेनखत कुजताना तयार होणारी ऊर्जा (ऊष्णता) ही कुणाला तरी स्वतःचे इंधन बनविते, शेनखत हे इंघन नाही  तर माघ्यम म्हणुन काम करत असते व जमिनीत असनारे ऑक्सिजन व नायट्रोजन हे इंघन म्हणून खर्ची पडत असतात, (ऑक्सिजन जास्त जळतो व नायट्रोजन थोडा कमी जळतो) केवळ या प्रकाराने द्राक्ष वेलीवर पुढे अनेक प्रकारच्या अन्नद्रव्ये कमतरते मुळे नुकसानच संभवते,  जमिनीत  नायट्रोजन कमी पडले म्हणजे फक्त नत्राची कमतरताच नाही तर इतरही अनेक अन्नद्रव्य नायट्रोजन शिवाय मुळीकडून उचलली जात नाहीत . (केवळ  याच कारणामुळे हिरवळीची खते ताग ढेंच्या सारखी पिके हिरवी ओली असतानाच जमिनीत गाडली गेल्यानंतर पुढील लगेचच घेणार्या पिकात नत्राची प्रचंड कमतरता तयार होते). अनेक वेळेस द्राक्ष वेलीस इतर सर्वच दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपुर देऊनही केवळ त्या घटकाना घेऊन जाणारा नायट्रोजन घटक कमी किंवा नसल्यामुळे सुद्धा द्राक्ष वेलीत या घटकांची कमतरता जानवते, या शिवाय मातीमधे ऑक्सिजन व नायट्रोजन च्या कमतरते मुळे जमिनीत ह्युमस ची निर्मिती सुद्धा मंदावते. म्हणून द्राक्ष बागेत शेनखत देताना ते एकतर शंभर टक्के पहिलेच कुजलेले (कंपोष्ट) असावे व तसे ऊपलब्ध नसल्यास असे खत जमिनीत न गाडता मातीच्या वरच्या थरात संपूर्ण बेडवर एकसारखे पसरून किंवा विस्कटून द्यावे व नंतर त्यावर  थोडेफार आच्छादन करून घ्यावे. इतर रासायनिक खते टाकायचीच झाल्यास सुपर फाॅस्फेट सोडून इतर खते शेनखत किंवा कंपोष्ट खतात मिसळू नयेत. ती स्वंतत्र टाकावित. 

आता आपण थोडा वेगळा विचार करून पाहू, शेनखत किंवा सेंद्रिय घटका सोबत कुजण्याच्या प्रक्रियेसाठी नत्र युक्त रासायनिक खते युरिया,  अमोनियम नायट्रेट सारखे खत दिल्यावर काय घडते ते पाहू, आपण सुरवातीलाच पाहिले की कुजण्याच्या प्रक्रियेत ऑक्सिजन व नायट्रोजन इंधनाचे काम करतात, पण नायट्रोजन कमी जळतो. या मिस्रणाने (शेनखत व युरिया) कुजण्याची प्रक्रिया आणखी जलद घडत राहते, व नत्र युक्त खतांचे रूपांतर नायट्रेट व अमोनिकल नायट्रेट मधे लवकर होते. कुजण्याच्या प्रक्रियेला कमी वेळ मिळाल्या मुळे इतर अन्नद्रव्ये (नत्र सोडून इतर) लवकर विघटीत होत नाहीत, त्यामुळे एकटे नायट्रेट मुळीवाटे जास्त प्रमाणात शोषले जाते, (हे म्हणजे वरातीच्या पुढे घोडे असच काहीस आहे , नायट्रेट म्हणजे घोडा व वरात म्हणजे इतर अन्नद्रव्ये) एकटे नायट्रेट फारच उपद्व्याप करून ठेवते. एकतर द्राक्ष वेलीचा शेंडा पळवते किंवा घडाची गर्भधारणा मोडित काढते दुसरे   वेलिची प्रतिकार क्षमता व काटकपणा कमी करते, म्हणून  सेंद्रिय घटकांच्या सोबत एकत्र रासायनिक खते देऊ नयेत किंवा अत्यल्प द्यावित, (खरड छाटणी वेळेस चालेल) हे नायट्रेट मुळे कमजोर असतानाही वेगवान हालचाली करून वेलीत प्रवेश मिळविते , अर्थात हालचाल नायट्रेट करत नाही तर मुळावरील जास्तीचा पडलेला निगेटिव्ह चार्ज चा भार हे सगळे घडवुन आणत असतो तो कसा व का भार वाढतो हे आपण मागील काही भागात समजून घेतले असेलच.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्