द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १७

द्राक्ष बागेस संतुलित मात्रेत खते वापरणे फायद्याचे ठरते, या साठी नियमित माती परिक्षण, पाणी परिक्षण व काडी देठ इत्यादी परिक्षण करूनच खंताचे नियोजन करणे गरजेचे आहे, अनेक शेतकरी शेंडा वाढ व भरपुर कॅनाॅपी साठी युरिया, अमोनियम नायट्रेट, युरिया फाॅस्फेट खतांचा अती प्रमाणात  वापर करत आहेत, त्यामुळे घडात साखर न भरण्याची नविनच समस्या तयार होत आहे, बहुतांश शेतकरी ऐन साखर (ब्रिक्स) भरायच्या वेळेस नत्र कमी करून पोटॅशियम ची मात्रा वाढविण्याचा प्रयत्न करतात, परंतू ऐन वेळी केलेल्या उपाययोजनेचा तितकासा उपयोग होत नाही, त्यासाठी नत्राचे नियंत्रण व पोटॅशियम चा वापर हा सुरवाती पासुनच नियोजन करावे लागेल. अलिकडील काळात द्राक्ष बागेत जमिनीत फाॅस्फरस ची कमतरता अनेक ठिकाणी जानवते आहे, ही तशी फारच गंभिर बाब बनत चालली आहे, 

मागील दोन वर्षात माझ्याकडे आलेल्या अनेक द्राक्ष बागेतील  माती नमुन्या मध्ये प्रयोगशाळेत परिक्षण केल्यानंतर फाॅस्फरस (स्फुरद) चे प्रमाण  हेक्टरी 10 किलोच्या खाली आलेले पहायला मिळाले आहे.  (एकूण नमुन्यापैकी 40 % नमुन्यात एवढे कमी फाॅस्फरस आढळले). वास्तविक पाहता द्राक्ष वेली साठी हे उपलब्ध फाॅस्फरस चे प्रमाण हेक्टरी 35 किलोच्या पुढे असायला हवे. अनेक मृदा तज्ञ मंडळी किंवा कृषी सल्लागार जमिनीत स्फुरद विरघळवणारे पिएसबी सारखे जिवाणू वापरण्याचा सल्ला देतात, कारण जमिनीत असनारे स्फुरद पीकाला सहसा सहज उपलब्ध होत नाही, अनेकदा रासायनिक खते मिस्त्र किंवा संयुक्त पद्धतीने दिली जातात व त्यातील स्फुरद इतर रासायनिक कनांसोबत संयोग होऊन क्लिष्ट संयुगावस्थेत जाते, अशा परिस्थितीत हे जिवाणू फायदेशीर ठरतात,  परंतू मातीतच स्फुरदाचे प्रमाण  अत्यल्प असल्यास हे जिवाणू फाॅस्फरस म्हणजेच स्फुरद तयार करू शकत नाहीत, स्फुरदाची पातळी वाढविण्या साठी राॅक फाॅस्फेट किंवा सिंगल सुपर फाॅस्फेट सारख्या खताचा वापर करणे जास्त फायदेशीर ठरते, सिंगल सुपर फाॅस्फेट कंपोष्ट किंवा सेंद्रिय खतांसोबत एकत्र मिसळून जमिनीत टाकल्यास सेंद्रिय खतामधिल नत्र व इतर अन्नद्रव्ये उपलब्धता अनेक पटीने वाढते. ऑक्टोबर छाटणी पुर्वी सेंद्रिय कंपोष्ट खतासोबत एकरी 250 ते 300 किलो सिंगल सुपर फाॅस्फेट एकत्र मिसळून मुळांच्या सानिध्यात दिल्यास सेंद्रिय घटकामधिल अन्नद्रव्ये द्राक्ष वेलीस मिळायला सहज सोपे होऊन जाते, जमिन अल्कली गुणधर्माची असल्यास (7.5 पिएच पेक्षा जास्त असल्यास) याच खतासोबत 40-50 किलो  बेंटोलाईट गंधक  वापरावे, (18 -20 %) म्हणजे पिएच थोड्याफार प्रमाणात  नियंत्रणात राहील.

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्


Posted Date - 26-09-2019

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १६ 

नमस्कार शेतकरी मित्राने, आपल्या द्राक्ष बागेतुन ऊत्तम व निर्यातक्षम द्राक्ष निर्मिती करणे हे प्रत्येक द्राक्ष बागाईतदाराचे स्वप्न असते,आणि तसा प्रयत्न ही प्रत्येक जन करत असतो, परंतू आजकाल अनेक बागाईतदार प्रत्येक वेळी संघर्षच करताना दिसतात, यास अनेक कारणेही  आहेत, तरिही  कोनत्याही परिस्थितीत ईच्छित उत्पादन व दर्जा कायम ठेऊन नियोजन करावे लागेल, या नियोजना साठी द्राक्ष वेलीचीच मदत घ्यावी लागेल, द्राक्ष वेलीत असणारे मजबुत स्टोअरेज (अन्न साठा) हिच वेलीची ताकत असते, द्राक्ष वेलीत असनारी ताकत व प्रतिकारक्षमता अचूक  मोजण्याची साधने अजून ऊपलब्ध (विकसित) झालेली नाहित तरिही थोड्याश्या अनुभवाने हे ओळखने जमु शकते . वेलीत भरपूर प्रतिकार  क्षमता ही त्या वेलीस ऊपलब्ध  झालेल्या अन्नद्रव्यावर अवलंबून असते, तथापी कर्ब नत्राचे गुणोत्तर साधल्यास (10 : 1) द्राक्ष  बागेत चांगली प्रतिकार क्षमता तयार होते व उत्पादन ही चांगले सहज मिळवता येते. द्राक्ष बागेस  नेमकी किती खते द्यावयाची सरळ मुद्यांवरच येऊयात, विश्रांती काळापासूनच सुरवात करूयात, साधारणपणे द्राक्ष बागेतील सर्वच घडांची काढणी (हार्वेस्टिंग)पुर्ण झाल्यावर दोन तिन दिवसातच  एकरी 100 किलो डिएपी मधल्या मोकळ्या जागेत एकसारखे फोकून टाकून लगेचच भरपूर मोकळे पाणी सोडावे म्हणजे मग पहिल्या उत्पादना मुळे आलेला द्राक्ष वेलीचा  तनाव दुर होईल.मोकळे देन्या ईतके पाणी नसल्यास मधोमध एक ऊथळ खोलीचे तास पाडून त्यात डिएपी टाकून वरती एक ठिबकची लाईन बसवून घ्यावी व किमान सहा तास पाणी ड्रिपमधून सोडावे, मात्र बोधावर डिएपी देऊ नये कारण उत्पादन तयार करण्याच्या काळात मुळांना सतत काम करून एक प्रकारची मरगळ आलेली असते, व मधल्या पट्ट्यात डिएपी व पाणि मिळाल्यावर अन्नद्रव्याच्या अमिशाने मुळे पुढे सरसावतात व परत ताजी तवाणी होऊन कामास लागतात, या काळात द्राक्ष वेलीची पहिल्या उत्पादना मुळे  झालेली झीज भरून काढली जाते.  (डिएपी व पाण्याच्या ओलाव्यामुळे मुळांच्या शेंड्यावर निगेटिव्ह चार्ज वाढतो व याच काळात वेलीच्या खोड व पानातील जमा झालेली विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात) नंतर आपली जमिन जर काळी व भारी असल्यास विस दिवस व जमिनी मध्यम ते हलकी असल्यास दहा बारा दिवसासाठी विश्रांती साठी सोडून द्यावी. या काळात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हलके पाणी देण्यास हरकत नाही, जमल्यास मोकळे पाणी देण्यापूर्वीच मोकळ्या पट्ट्यात थोडेसे बाजरी,गहू  व ज्वारीचे बियाणे एकत्र करून  विस्कटून टाकावे म्हणजे ते आठ दहा दिवसात दोन तिन इंचा पर्यंत ऊगवुन येईल एप्रिल छाटणी करण्या पुर्वी च ते लहान ऊगवलेले धान्य कुळव किंवा ट्रॅक्टर ने मोडून टाकावे (हिरवळीचे मिनी खत) याच खतासोबत दोन खोडाच्या मधे लहान चर खोदून पाच सहा टन ऊत्तम कुजलेले मिक्स कंपोष्ट खत टाकले तरी चालेल. जमल्यास बेडवर ऊसाचे पाचटाचे आच्छादन करून घ्या  व योग्य  वेळ पाहून एप्रिल छाटणी करून घ्यावी, खरड छाटणी नंतर तापमान जर जास्त असेल तर दोन तीनदा बागेस  मोकळे पाणी सोडावे, वेलीच्या ओलांड्यावर हायड्रोजन सायनामाईड चे पेस्टिंग किंवा फवारणी करून घ्यावी म्हणजे सगळ्या बागेत एकसमाण व लवकर फुटी निघतील. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्  


Posted Date - 26-09-2019

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १५

शेतकरी बंधूनो ऊत्तम दर्जेदार द्राक्ष निर्मिती साठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर द्राक्ष बागेत सतत करावा लागेल, प्रत्येक वर्षी साधारणता एकरी 10 ते 12 टन सेंद्रिय खत द्राक्ष बागेस दिले जावे तथापी  एकाच प्रकारचे शेनखत किंवा कंपोष्ट संपूर्ण देण्यापेक्षा ऊत्तम कुजलेले शेनखत 40 % ,  हिरवळीचे खत 20%, प्रेसमड 10%, गांढूळ खत 10%, विविध प्रकारच्या सेंद्रिय पेंडी 10% , बाॅयलर पोल्ट्री खत 7 % व तयार भुसुधारक खत 3% हे सगळे घटक एकत्र करून एकाच वेळी देण्यापेक्षा दोन भागात दिल्यास अधिक फायदेशीर राहील, पैकी हिरवळीचे खत विश्रांती काळात दिलेले योग्य ठरेल, या शिवाय देशी गाईचे शेन व गोमुत्रा पासून तयार केलेली स्लरी किमान महिण्यातून एगदा देता येईल. तसेच विविध प्रकारची जिवाणू खते वेळोवेळी दिल्यास  फारशी रासायनिक स्वरूपातील खते मोठ्या प्रमाणात देण्याची गरज भासणार नाही, द्राक्ष वेलीस सर्वाधिक जास्त प्रमाणात  लागणारे अन्नद्रव्य म्हणजे नत्र होय. एप्रिल छाटणी किंवा  ऑक्टोबर छाटणी पुर्वी माती परिक्षण केल्यास जमिनीत असणारे ऊपलब्ध नत्राचे प्रमाण समजू शकते, जमिनीत सेंद्रिय कार्बने किती % प्रमाण आहे यावर नत्र किती हे सहज समजते, समजा आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.80 % च्या आसपास असल्यास त्या जमिनीत ऊपलब्ध नत्राचे प्रमाण हेक्टरी  500 किलोच्या जवळपास असतेच असते, यातील 20 % नत्र काही कारणांमुळे अनुपलब्ध झाले तरिही 400 किलो नत्र शिल्लक व ऊपलब्ध होऊ शकते, या शिवाय द्राक्ष बागेस  नियमित दिले जाणारे पाणी प्रयोगशाळेत परिक्षण केल्यास पाण्यातील नायट्रेट चे प्रमाण प्रती लिटर मधे 80 ते 185 पीपीएम एवढे आढळून येत आहे आणि पाण्यात विरघळलेले नायट्रेट सर्वाधिक पिकांकडून शोषले जाते, द्राक्ष बागेचा विचार केल्यास अशा पाण्याच्या माध्यमातून अंदाजे एकूण वर्षभरात हेक्टरी 125 किलो च्या आसपास नत्र ऊपलब्ध होऊ शकते, तसेच पावसाळ्या पुर्वी व पावसाळी वातावरणातून जमिनीत व द्राक्ष वेली कडून शोषन होनारे नत्र ही हेक्टरी 100 ते 150 किलो ऊपलब्ध होत असते, आणि आपण जे सेंद्रिय घटक देणार आहोत यातून ही हेक्टरी 150 किलो नत्र द्रव्याचा  पुरवठा होतो. (हेक्टरी एकूण 25 टन सेंद्रिय खतांमधून 0.6 % दराने नत्र ऊपलब्ध होईल असे गृहित धरूयात), आता आपल्या द्राक्ष बागेस एकूण 775 ते 800 किलो नत्र या सर्व परिस्थितीत आरामात मिळू शकते.  आता आपण नत्र किती शिफारस आहे ते पाहूयात,  मागील भागात आपण पाहिले की द्राक्ष बागेस हेक्टरी 900 किलो नत्र लागते म्हणजे आता हिशोब केल्यास हेक्टरी 100 ते 125 किलो नत्र अजून कमी पडते आहे, हे कमी पडलेले नत्र दोन्ही छाटणी वेळेस विभागुन द्यायचे ठरले तरी एका वेळी हेक्टरी  110 किलो युरिया देऊनही बागेची संपूर्ण नत्राची मात्रा पुर्ण होऊ शकते. द्राक्ष वेलीस नत्र पुर्ण क्षमतेने मिळाल्यास द्राक्ष वेलिच्या वाढीबरोबरच उत्पादन ही चांगले मिळते परंतू हेच नत्र गरजेपेक्षा जास्त झाल्यास द्राक्ष बागेवर वेगवेगळे दुष्परिणाम ही होतात, गरजेपेक्षा अती प्रमाणात नत्र पुरवठा केल्यास वेलीची अतिरिक्त वाढ होणे, अलावश्यक फुट होणे, पानांची  संख्या गरजेपेक्षा जास्त होते, पानांची जाडी कमी होते, पाने व काडीचा ठिसूळ पणा वाढतो त्यामुळे डाऊणी व भुरी सारखे  बुरशी लगेच वेलीत प्रवेश करते, रस शोषून घेनार्या किडी  प्रमाणापेक्षा जास्त वाढतात, घड पक्वतेचा कालावधी वाढतो या शिवाय अतिरिक्त नत्रामुळे इतर काही अन्नद्रव्ये वेलीस वेळीच ऊपलब्ध होत नाहीत. केवळ नत्र द्रव्याच्या असंतुलना मुळे च आज अनेक द्राक्ष बागाईतदार अनेक समश्यांना तोंड देत आहेत. म्हणुनच नियमित माती परिक्षण करूणच खतांचे संतुलन साधणे गरजेचे झाले आहे. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्  


Posted Date - 26-09-2019

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १४

आपण या पुर्वी  च्या काही भागात सेंद्रिय कर्ब व त्याची  जमिनीला व द्राक्ष वेलीस किती गरज आहे हे पाहिले आहे, उच्च प्रतीची द्राक्ष घड निर्मिती करण्यासाठी   अनेक घटक कारणीभूत असतात त्यातीलच विविध प्रकारची अन्नद्रव्ये लागतात,  प्रमुख अन्नद्रव्यामध्ये  नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य घटक आहेत त्याच बरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक हे दुय्यम घटक व ईतरही अनेक सुक्ष्म अन्नद्रव्ये ही थोड्या अधिक प्रमाणात लागतात. द्राक्ष वेलीच्या वाढीच्या  विविध  अवस्थांमधे वेगवेगळ्या अन्न घटकांची  गरज भासत असते . मुळांची चांगली वाढ होण्यासाठी स्फुरद लागते तर वेलीची शारिरीक वाढ  व शेंडा व काडीची निर्मिती करण्यासाठी नत्र + स्फुरदाची गरज असते व घडांचा विकास व वाढ होण्यासाठी नत्र + पालाश या घटकांची गरज नेहमी लागत असते. सर्वसाधारणपणे  थाॅमसन, शरद सिडलेस, ताश गणेश, सोनाका आदी जातींमधे हेक्टरी विस ते पंचवीस टन चांगल्या प्रतीच्या द्राक्ष घडांचे  उत्पादन मिळते, तथापी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जातीपरत्वे आपल्याला  किती उत्पादन घ्यायचे आहे त्यानुसारच किती  (अन्नद्रव्ये ) खते द्यावयाची आहेत ते ठरवावे लागते, आता आपण थोड्या वेगळ्या बाजूने विचार करूयात, द्राक्ष घडांचे शास्त्रीय पृथ्थकरण केल्यास असे  समजते की द्राक्ष मण्यांमधे एकूण वजनाच्या 84.5 % पाणी व 14.5 % घन पदार्थ आढळून येतात, याचा अर्थ असा की द्राक्ष मण्यांमधे पाणी सोडून 14.5 % घन पदार्थाची निर्मिती होणे गरजेचे आहे, व हे घन पदार्थ विविध प्रकारच्या अन्न घटकापासूनच तयार होत असतात (म्हणजे एकूण घन पदार्थाच्या वजना इतके खत देने असा अर्थ नाही) एप्रिल छाटणी व ऑक्टोबर छाटणी अश्या दोन वाढीच्या कालखंडात ही अन्नद्रव्ये पुरवठा करावी लागतात, या दोन्ही वेळेस मिळून द्यावयाची एकून  खंतापैकी एप्रिल छाटणी वेळेस आर्धे नत्र व आर्धे स्फुरद  द्यावे लागेल व बाकी आर्धे नत्र आर्धे स्फुरद व संपूर्ण पालाश हे ऑक्टोबर छाटणी वेळेस दिले पाहिजे, सर्वसाधारणपणे ऑक्टोबर छाटणी पुर्वी एका द्राक्ष वेलीच्या संपूर्ण मुळासकट भट्टीत जाळून केलेल्या कोरड्या  राखेच्या वजना  इतकी एकूण अन्नद्रव्ये त्या वेलीस लागतात. मग आता कोनत्या बागेस किती अन्नद्रव्ये किंवा खते द्यायचे ते त्या  द्राक्ष बागेच्या वय व विस्तारावर अवलंबून राहील, या शिवाय जमिनीत पहिली किती अन्नद्रव्ये शिल्लक आहेत याचाही विचार करावा लागेल, या साठी ऑक्टोबर छाटणी पुर्वीच बागेतील माती व आपण बागेस नियमित देणारे पाणी या दोन्हीं ची प्रयोगशाळेत तपासणी करून घेने महत्वाचे ठरते. या पुर्वीच अनेक द्राक्ष तज्ञांनी बागेस एप्रिल व ऑक्टोबर वेळेस मिळून एन पि के  ची मात्रा किती द्यायची हे ठरवले आहे,  हेक्टरी 900 किलो नत्र, 500 किलो स्फुरद व 700 किलो पालाश एवढी या तिनच घटकांची मात्रा लागते, मग माती परिक्षणा मधे जमिनीत ऊपलब्ध एन पी के ची मात्रा किती आहे हे कळाल्या नंतर तेवढी मात्रा एकूण शिफारस केलेल्या मात्रेतून वजा करावी लागेल, या शिवाय बागेस  नियमित दिले जाणारे पाणी ही परिक्षण करून घेने महत्वाचे ठरेल,  कारण आता पाणीही पुर्वी सारखे स्वच्छ व सोज्वळ राहिलेले नाही,  विशेषत थेट नदी किंवा कॅनाॅलच्या ही पाण्यात नत्र, स्फुरद,  पालाश, कॅल्शियम, सोडीयम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक मुक्त आयन्स स्वरूपात व मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, या सगळ्या मुद्द्यांवरच   नेमकी कोनती अन्नद्रव्ये किती प्रमाणात व कधी द्यावित, या सगळ्याचा विचार आपण पुढील भागात विचार करणार आहोत. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्    


Posted Date - 26-09-2019