द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ११

Posted Date - 26-09-2019

जमिनीत सेंद्रिय कार्बन जसा महत्वाचा असतो  अगदी तसेच मातीला समृध्द करण्यामध्ये सूक्ष्म जीवाणू  फार महत्वाची भूमिका पार पाडत असतात . आजच्या भागात आपण या सूक्ष्म जीवाणूचे नेमके कार्य कसे चालते हे पाहणार आहोत .
अझोटोबॅक्टर, अझोस्पिरीलम, अॅसेटोबॅक्टर हे जीवाणू जमिनीत मुक्तपणे राहून नत्रवायुचे जमिनीत स्थिरीकरण करतात. रायझोबियम जीवाणू कडधान्य पिकाशी सहजीवी नाते प्रस्थापित करतात. पिकांच्या मुळांतील गाठींत राहून मुक्त नत्र शोषून स्थितीकरण करतात. हे जीवाणू नत्रवायूचे रुपांतर अनोमियात करतात. अनोमियापासून नत्राची अन्य संयुगे तयार होऊन ती झाडांना उपलब्ध होतात. या प्रक्रियेला नत्र स्थितीकरण म्हणतात.
बॅसिलम व स्युडोमोनासच्या विविध प्रजाती मातीच्या कणांवर स्थिर झालेल्या व उपलब्ध नसणाऱ्या स्फुरदाचे विघटन करतात. त्याचे पाण्यात विरघळू शकणाऱ्या द्राव्य स्वरुपात रुपांतर करतात. स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणूंकडून काही विशिष्ट प्रकारची आम्ले उत्सर्जित होतात.अविद्राव्य स्वरूपातील स्फुरदाबरोबर ती संयोग पावतात. त्याचे रुपांतर विद्राव्य (उपलब्ध) स्वरुपात करतात.
मायकोरायझा ही बुरशी पिकांच्या मुळांसोबत सहयोगी पद्धतीने स्फुरद, जस्त यांसारख्या अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध करून देते. कमी सुपीकतेच्या जमिनीतून फॅास्फेट तसेच जमिनीच्या खोल थरातील पाणी शोषून पिकास पुरविते.
जमिनीतील अविद्राव्य स्वरूपातील गंधकाचे विघटन करून सल्फेट या स्वरुपात रुपांतरीत करण्याचे काम थायोबॅसिलस या जीवाणूंकडून होते. बॅसिलस व सुडोमोनासच्या काही प्रजाती जस्त, लोह, तांबे व कोबाल्ट आदी अन्नद्रव्ये विरघळविण्याचे काम करतात.
फेरोबॅक्टेरीयम, लीप्तोथ्रीक्स हे जीवाणू जमिनीत असलेल्या पालाशची हालचाल वाढवून पिकास तो उपलब्ध करून देतात.   जमिनीतील सूक्ष्मजीव सेंद्रिय पादार्थ कुजविण्याचे काम करतात, त्यासाठी सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या सुक्ष्मजीवांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जमिनीत वापरलेले सेंद्रिय पदार्थ जमिनीतील वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांच्या प्रभावाखाली कुजविण्याच्या प्रक्रियेत येतात. त्यायोगे सेंद्रिय पदार्थांमध्ये बंदिस्त वनस्पतीची पोषकद्रव्ये जमिनीमध्ये सोडली जातात. ती पिकांना सहज उपलब्ध होतात. 
मूळ कुजणे, खोड सडणे, पानगळ, झाडे वाळणे आदी रोगांना हानिकारक बुरशी कारणीभूत असतात. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी ट्रायकोडर्मासारखी बुरशी उपयुक्त ठरते. काही सूक्ष्मजीव पिकांच्या मुळाभोवती रोगकारक बुरशींना घातक प्रतीजैविके उत्सर्जित करतात. स्युडोमोनस फ्लोरेसेन्स हा जीवाणू पिकाच्या मुळाभोवती किंवा मुळावर सक्रीय राहून काही बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण करते.
अॅक्टनोमायसेटस व बुरशी हे सूक्ष्मजीव त्यांच्या शरीरातून चिकट डिंकासारखा पदार्थ उत्सर्जित करतात,  त्यामुळे मातीचे कण एकत्रित घट्ट ठेवले जातात.त्यामुळे मातीचे संयुक्त कण निर्माण होऊन धूप कमी होण्यास मदत होते.
अॅझोटोबॅक्टर, अॅझोस्पिरीलम व अन्य सूक्ष्मजीव पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या पदार्थांची निर्मिती करतात. उदा. जीबरेलिक अॅसिड, व्हिटॅमिन-१२, इंडोल अॅसिटीक आम्ल, निकोटिनिक आम्ल, पेंटोथेनिक आम्ल, कोलिक आम्ल, बँयोटीन...
जमिनीत अतिक्षारामुळे पिकवाढीवर तसेच जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या वाढीवर व त्यांच्या जैविक क्रीयेवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीतही काही सूक्ष्मजीव तग धरून आपले कार्य चालू ठेवतात, सेंद्रिय आम्ल उत्सर्जित करतात.त्यामुळे चुनखडी विरघळून चुना मुक्त होतो. मातीच्या कणावर असलेल्या सोडीयमची जागा घेतो. अशा तऱ्हेने सोडियम क्षाराचे प्रमाण कमी होऊन चोपण जमिनीची सुधारणा होते.
रायझोबियम जीवाणूंमुळे कडधान्यांच्या मुळांवर गाठी निर्माण होतात, त्यामुळे मुक्त नत्राचे मोठ्या प्रमाणावर स्थिरीकरण होते, त्यामुळे कडधान्याला नत्र खते कमी प्रमाणात लागतात. नत्र स्थिर करणारे व मुळांवर गाठी निर्माण करणाऱ्या जीवणूंतील गुणसूत्रे अॅग्रो बॅक्टेरीयमच्या उपयुक्त जीवणूंमध्ये सोडून त्याच्या वापराने तृणधान्य पिकाच्या मुळांवरही गाठी निर्माण करता येतात.

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्